सूस-म्हाळुंगे रस्त्यावरील खड्ड्यामुळे मृत्यू; मुलाच्या कुटुंबाला ६ लाख नुकसानभरपाई द्या – श्रीनाथ भिमाले

पुणे : खड्ड्यामुळे मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबाला सहा लाखांची नुकसानभरपाई द्या; श्रीनाथ भिमाले यांची आयुक्तांना सूचना

उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी

पुणे : सूस-म्हाळुंगे रस्त्यावरील खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्याच्या कुटुंबाला तातडीने सहा लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी सूचना पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना केली आहे. यासंदर्भात त्यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे.

सूस-म्हाळुंगे रस्त्यावर खड्डा आणि चिखलामुळे दुचाकी घसरून झालेल्या दुर्घटनेत दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पुणे शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या दुर्घटनेत मुलाच्या कुटुंबातील अन्य सदस्यही जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करा

मुंबई उच्च न्यायालयाच्या १३ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या आदेशाचा दाखला देत भिमाले यांनी महापालिकेने या प्रकरणाची स्वतःहून दखल घ्यावी, संबंधित समितीसमोर प्रकरण ठेवावे आणि नुकसानभरपाईची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी केली आहे.

खड्डे किंवा उघड्या गटारांमुळे मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसांना नुकसानभरपाई देण्याबाबत न्यायालयाने निर्देश दिल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

जबाबदार अधिकारी, अभियंता आणि कंत्राटदारांची चौकशी करा

संबंधित रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी कोणत्या विभागाकडे होती, याची चौकशी करण्यात यावी. खड्डा वेळेत दुरुस्त न करण्यास जबाबदार अधिकारी, अभियंता किंवा कंत्राटदाराची जबाबदारी निश्चित करून दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणीही भिमाले यांनी केली आहे.

तसेच खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये नुकसानभरपाई देण्यासाठी सुलभ आणि स्वतंत्र कार्यपद्धती तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.

“सूस-म्हाळुंगे दुर्घटनेतील मृत मुलाच्या कुटुंबाला सहा लाख रुपये नुकसानभरपाई तातडीने द्यावी. सुरक्षित रस्ते देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. न्यायालयाचा आदेश असताना पीडित कुटुंबाला मदतीसाठी प्रतीक्षा करायला लावू नये.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button