
पुणे : आळंदी रोडवरील बीआरटी मार्गिका काढल्यानंतर नागरिकांच्या सोयीसाठी गरज असलेल्या ठिकाणी नवीन बसस्टॉप उभारण्याची मागणी होत असताना, ज्या ठिकाणी आधीच दोन बसस्टॉप आहेत, त्याच ठिकाणी तिसरा बसस्टॉप उभारण्याचा प्रस्ताव का राबविला जात आहे, असा सवाल स्थायी समिती सदस्य सुहास टिंगरे यांनी उपस्थित केला आहे.
पुणेकरांच्या करातून जमा होणाऱ्या निधीचा योग्य आणि गरजेनुसार वापर झाला पाहिजे. नागरिकांना ज्या ठिकाणी प्रत्यक्ष सुविधा आवश्यक आहेत, त्या भागात बसस्टॉप उभारण्याऐवजी आधीच सुविधा असलेल्या ठिकाणी पुन्हा खर्च करणे योग्य नसल्याचे टिंगरे यांनी म्हटले आहे.
आळंदी रोडवरील बीआरटी मार्गिका काढल्यानंतर ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन बसस्टॉपची गरज असलेल्या ठिकाणांची पाहणी करून तेथे सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी यापूर्वीही करण्यात आली आहे. मात्र, नागरिकांच्या गरजांकडे दुर्लक्ष करून दोन बसस्टॉप असलेल्या ठिकाणी तिसरा बसस्टॉप उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
“एका बाजूला अनेक भागांमध्ये नागरिकांना बस पकडण्यासाठी लांब अंतर चालावे लागते. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अडचणींचा सामना करावा लागतो, तर विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित बसथांब्यांची गरज आहे. अशा ठिकाणी सुविधा देण्याऐवजी आधीच दोन बसस्टॉप असलेल्या ठिकाणी तिसरा बसस्टॉप का उभारला जात आहे?” असा प्रश्न टिंगरे यांनी उपस्थित केला.
महापालिकेचा निधी हा पुणेकरांच्या करातून जमा होतो. त्यामुळे प्रत्येक रुपयाचा खर्च हा नागरिकांची गरज, उपयोगिता आणि सार्वजनिक हित लक्षात घेऊनच झाला पाहिजे. केवळ निधी खर्च करण्यासाठी किंवा कागदोपत्री कामे दाखविण्यासाठी अनावश्यक प्रकल्प राबविले जाणार असतील, तर त्याला विरोध केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
याबाबत सुहास टिंगरे म्हणाले, “राजकारण वेगळे आणि पुणेकरांचे हित वेगळे. राजकीय मतभेद असतील, पण पुणेकरांच्या पैशांची उधळपट्टी होत असेल तर मी गप्प बसणार नाही. जनतेच्या पैशाचा प्रत्येक रुपया हा जनतेच्या सुविधेसाठीच खर्च झाला पाहिजे. गरज नसलेल्या कामांना विरोध आणि गरजेच्या कामांसाठी संघर्ष, हीच माझी भूमिका राहणार.”
गरज असलेल्या ठिकाणी नवीन बसस्टॉप उभारून नागरिकांना सुविधा देण्याऐवजी दोन बसस्टॉप असलेल्या ठिकाणी तिसरा बसस्टॉप उभारण्याचे कारण प्रशासनाने स्पष्ट करावे, अशी मागणी टिंगरे यांनी केली आहे.